अकोले तालुक्यातील खळबळ जनक घटना,
महिलेवर अत्याचार, अत्याचार करणाऱ्याचा खून
राजूर (प्रतिनिधी ) : - अकोले तालुक्यातील आदिवासी भागातील महिलेवर एकाने अत्याचार केला. त्यामुळे पीडित महिलेच्या संतप्त झालेल्या कुटुंबीयांनी आरोपीस पकडून, बेदम चोप दिला. त्यात आरोपी राजू गणपत सोनवणे (वय 45, रा. शिरपुंजे, ता. अकोले) याचा मृत्यू झाला. याबाबत राजूर पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध अत्याचाराचा, तर पीडित महिलेच्या कुटुंबीयांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अत्याचाराबाबत पीडित महिलेने राजूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पीडित महिला मंगळवारी (ता. 4) दुपारी साडेबाराच्या सुमारास जायनावाडी गावाच्या शिवारातील खंडोबाच्या माळावर जनावरे चारण्यासाठी घेऊन गेली होती. त्या वेळी आरोपी राजू सोनवणे याने महिलेवरच अत्याचार केला, असे फिर्यादीत म्हटले आहे. पीडित महिलेने हा प्रकार घरी आल्यावर कुटुंबीयांना सांगितला. त्यामुळे संतप्त झालेल्या कुटुंबीयांनी गावातील दगडी बाकाला बांधून आरोपीला बेदम मारहाण केली. मारहाणीत आरोपी गंभीर जखमी झाला होता. त्यानंतर त्यास राजूर पोलिस ठाण्यात आणले. तेथील तपासणीसाठी त्याला राजूर ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्याला नाशिकला हलविण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.
याबाबत गावातील पोलिस पाटलांनी राजूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार महिलेवरील अत्याचाराच्या रागातून तिच्या कुटुंबीयांनी राजू सोनवणे यास बेदम मारहाण केली. त्यात त्याचा मृत्यू झाला असे फिर्यादीत म्हटले आहे. त्यावरून राजूर पोलिसांनी पीडित महिलेच्या कुटुंबातील तिघांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला. सर्व आरोपींना अटक केली. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक नितीन पाटील करीत आहेत. आदिवासी भागातील महिलेवर अत्याचार तसेच अत्याचार करणाऱ्याचा खून अशी घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.
Comments
Post a Comment