महिला बचत गटाचे मेळावा

आर्थिक सामर्थ्य व स्वातंत्र्यामुळे महिला मानसिकदृष्टया सुदृढ, स्वाभिमानी व तेजस्वी होतील :-आदर्श सरपंच सौ.हेमलताताई पिचड 
अकोले ( प्रतिनिधी ):- आर्थिक सामर्थ्य व स्वातंत्र्यामुळे महिला मानसिकदृष्टया सुदृढ, स्वाभिमानी व तेजस्वी होतील असे मत राजूर च्या आदर्श सरपंच सौ.हेमलताताई पिचड यांनी व्यक्त केले.
           नियाजित समर्थ महिला कृषी प्रक्रिया व विक्री सहकारी संस्थेच्या स्थापनेसाठी जिल्हा सहकारी बँक अकोले येथील सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या स्त्री शक्ति महिला मेळाव्यात सौ पिचड या अध्यक्षपदावरून बोलत होत्या. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून अड.वसंतराव मनकर , अकोले नगरपंचायत च्या नगराध्यक्षा सौ संगीता शेटे, आदिवासी सेवक माधवराव गभाले, आदी उपस्थित होते.
    सौ पिचड बोलताना म्हणाली की, अकोले तालुक्यात नैसर्गिक समृध्दी मोठी आहे व तालुक्यातील महिला अत्यंत कष्टाळू व जिद्दी आहेत. अॅड.मनकरांसारखा चांगला मार्गदर्शक मिळाला तर या सर्व महिला आपल्या स्वत:चे असे विश्व उभे करु शकतात. यासाठी महिलांनी धाडसाने पावले टाकून या संस्थेचे सभासद व्हावे असे आवाहन सौ.पिचड यांनी केले व त्यांनी मी सदैव या संस्थेबरोबर कार्यरत राहील असा विश्वास महिलांना दिला.
          या मेळाव्यात अॅड्.वसंतराव मनकर यांनी संस्थेचे उदिष्टये, ध्येय व आगामी काळात संस्थेचा आलेला संकल्प विस्ताराने विषद केला.  गरजू महिलांना स्वत:च्या पायावर उभे करुन त्यांना स्वयंमपूर्ण करणे त्यांच्या स्वत:चा व्यवसाय मोठया प्रमाणावर उभा करणे व त्यांनी तयार केलेल्या मालाचे मार्किटींग करणे हाच संस्थेचा मुख्य उद्देश आहे. 
      या मेळाव्यात नगरसेविका सोनाली नाईकवाडी, मंदा साळुंके, पुनम पवार, अे.डी.सी.सी बँकेचे अधिकारी देशमुख, भांडकुळे, सौ.फापाळे, सौ.कुमुदिनी पोखरकर, आदिंनी आपले मनोगते व्यक्त केली. या मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी प्रतिभा सूर्यवंशी, प्रतिभा मनकर, कविता नवले, सुनिता राठी, छाया धुमाळ, संगीता झोळेकर, प्रमिला मोहिते आदि महिलांनी यशस्वी प्रयत्न केले. या मेळाव्यास तालुक्यातील ३०० बचतगटांच्या महिलांनी आपला सहभाग नोंदविला.
     कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व प्रास्तविक नगरसेवक प्रमोद मंडलिक यांनी केले तर आभारप्रदर्शन अकोले नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा सौ.संगीता शेटे यांनी केले. त्यानंतर महिलांनी सक्रांतीनिमित्त हळदीकुंकु समारंभ संपन्न झाला. तालुक्यातील महिला व बचतगटांनी उत्स्र्फुत पाठींबा दिला

Comments