बाल आनंद मेळावा


व्यवहारिक ज्ञान व सामाजिक भान जिल्हा परिषद शाळा देतात- जालिंदर वाकचौरे

अकोले, ता. १८, (प्रतिनिधी)- "मातृभाषेतून शिकताना मुलांना संकल्पना स्पष्ट होतात, विषय नीट समजतात. तणावमुक्त वातावरणात विद्यार्थी आनंदभराने शिक्षण घेतात. मूल्याधिष्ठित शिक्षणाबरोबरच जीवनोपयोगी संस्कार देणाऱ्या मराठी शाळा मुलांची मातीशी असलेली नाळ तुटू देत नाहीत. बाल आनंद मेळाव्यासारख्या उपक्रमांमुळे मुलांच्या व्यक्तीमत्त्वाचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होते. व्यवहारिक ज्ञान आणि सामाजिक भान केवळ जिल्हा परिषदेच्या शाळाच देतात. जिल्हा परिषदेच्या शाळांतील शैक्षणिक गुणवत्ता कौतुकास्पद असल्याने पालकांचा ओढा पुन्हा एकदा जिल्हा परिषद शाळांकडे वाढत असल्याचे सकारात्मक चित्र दिसत आहे," असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीचे सदस्य जालिंदर वाकचौरे यांनी केले.

देवठाण जिल्हा परिषद गटाचा बाल आनंद मेळावा डोंगरगाव येथे आज उत्साहात संपन्न झाला. गटातील अठ्ठेचाळीस शाळांमधील मुले, मुख्याध्यापक, शिक्षक तसेच पालक या मेळाव्यात सहभागी झाले होते. मेळाव्याचे उदघाटन श्री. वाकचौरे यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. गटशिक्षणाधिकारी अरविंद कुमावत, विस्तार अधिकारी राजेश पावसे, अरुण शेळके, अधीक्षक धोदाड, केंद्रप्रमुख अशोक ढगे, नाथू मुठे, राजेंद्र बागडे, भाऊसाहेब जगताप, चंद्रभान उगले आदी मान्यवर उपस्थित होते.

'मराठी शाळांची गुणवत्ता इंग्रजी शाळांपेक्षा अधिक आहे, पालक उगीच इंग्रजीचा बाऊ करत आहेत,' असे मत ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते कारभारी उगले यांनी नोंदवले. अकोले पंचायत समितीचे उपसभापती मारुती मेंगाळ, माजी सभापती दादापाटील वाकचौरे, सरपंच बाबासाहेब उगले यांचीही भाषणे झाली. बीटचे विस्तार अधिकारी(शिक्षण) बाळासाहेब दोरगे यांनी प्रास्ताविक केले.

मासवड्यांसारख्या अस्सल गावरान चवीच्या खाद्य पदार्थांचे स्टॉल्स, मुलांनी भरवलेल्या भाजीबाजारात भाजीपाला-फळांच्या विक्रीतून मिळालेला 'खऱ्या कमाई'चा आनंद, विमान प्रवासासह इस्रो सहलीचा अनुभव घेतलेल्या विद्यार्थ्यांची रंगतदार मुलाखत, महाराष्ट्राच्या लोकधारेचे दर्शन घडवणारे सांस्कृतिक कार्यक्रम, ग्रंथदिंडी, वृक्षदिंडी, मनोरंजक खेळ, प्रश्नमंजुषा स्पर्धा, प्रश्नोत्तरांचा चालता-बोलता कार्यक्रम, कला प्रदर्शन अशा नानाविध कार्यक्रमांची रेलचेल असलेल्या या बाल आनंद मेळाव्यात मुलांनी दिवसभर मौजमजेची लयलूट करत जीवन शिक्षणाचा खराखुरा आनंदानुभव घेतला. वर्ग-शाळा, पाटी-दप्तर-पाठ्यपुस्तकांशिवाय चार भिंतीबाहेरील शिक्षणानुभव आणि वैशिष्ट्यपूर्ण आठवणी देणारा आजचा दिवस विद्यार्थ्यांसाठी अत्यंत संस्मरणीय ठरला.

आनंद मेळाव्यात पन्नासहून अधिक स्टॉल्स होते. चहा, कॉफी, केक, पाववडा, भजे, भेळ, पाणीपुरी, इडली-सांबर, पालकपुरी, गुलाबजाम, चिक्की, सोयाबीन चिली, फुटाणे, खारे शेंगदाणे, विविध फळे आणि इतर खाद्यपदार्थ मुलांनी विक्रीसाठी ठेवले होते. मुलांनी जोरदार ताव मारल्यामुळे दुपारपर्यंत सगळे खाद्यपदार्थ संपले होते. येथे मुलांनी भाजीबाजार भरवला. मुलांनी आपल्या घरच्या भाज्या विक्रीसाठी आणल्या होत्या. मोठ्या माणसांनी भाजीपाला विकत घेत मुलांचा उत्साह वाढवला. अनेक मुलांनी आयुष्यात पहिल्यांदाच स्वत: काम करुन पैसे कमावले. मेळाव्यात सुमारे चाळीस हजारांची उलाढाल झाली! एरवी वर्गात अंकगणिताची आकडेमोड करणाऱ्या मुलांनी व्यवहारातले गणित इथे प्रत्यक्ष कृतीतून समजून घेतले. या आगळ्या आनंदानुभवाने मुले हरखून गेली होती. 

विविध गावांचे सरपंच, शाळांच्या शालेय व्यवस्थापन समित्यांचे अध्यक्ष, कार्यकर्ते यांनी मेळाव्यास भेटी दिल्या. सबाजी दातीर यांनी सूत्रसंचालन केले. डोंगरगाव शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक आणि पालकांनी तसेच गावकऱ्यांनी आनंद मेळावा यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.

Comments