तमाशा कलाकार पती पत्नी दाम्पत्य ची वाचा कहाणी

अकोले तालुक्यातील लोक कलावंतांची अवहेलना

वयाची पंचाहत्तरी गाठलेल्या पती पत्नी कलाकारांची उपेक्षा

घर देता का घर??
मानधन मिळेल का??
या 

अकोले ( प्रतिनिधी )चमके शिवबाची तलवार, तळपत्या बिजलीचा अवतार .., ‘लई..लई..लई.. जगभर नाव माझ्या भिमान गाजवलं...’ अशा पहाडी आवाजात शाहिरी गीत सादर करत लोकमनोरंजना बरोबर लोककला जोपासण्यासाठी आपली शेतजमीन गहाण टाकली. मात्र काळाच्या ओघात या कलाकारा कडे सर्वांचेच दुर्लक्ष झाले. त्यामुळे अकोले तालुक्यातील पाडाळणे येथील वयाची पंचाहत्तरी गाठलेल्या वृध्द कलावंत दांम्पत्यावर उपासमारीची वेळ आली आहे.
          ७५ वर्षाचे वृध्द तमाशा कलावंत किसन मारुती देठे यास अद्याप कलाकार मानधन मिळत नाही. कलाकार मानधनासाठी अर्ज करुन देखील अद्याप शासन दरबारी दखल घेतली गेली नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित भीम गीते सादर करणाऱ्या त्यांच्या पत्नी सखुबाई यांना शासनाचे प्रतिमहा दोन हजार रुपये मानधन मंजूर आहे. मात्र तेही  दोन-तीन महिन्यांनी एकदा ते मिळते. वयपरत्वे जडलेल्या व्याधींच्या औषधोपचारासही ती रक्कम पुरत नाही. राहण्यासाठी पक्के घर नाही.
      राहुरी येथे बोर्डिंगमध्ये राहून सातवीपर्यंत शिक्षण घेतलेल्या किसन यांनी लग्नानंतर मुंबई गाठली. टेलिफोन खात्यात सहा-सात वर्षे नोकरी केली. लहानपणा पासून त्यांना तमाशाची आवड होती. मुलुंड-चेंबूर भागात राहात असताना त्यांची मैत्री तमाशा कलाकारांबरोबर झाली. टेलिफोनचे काम सोडून देत संगम केदार यांच्या तमाशात काम करायला सुरुवात केली. तमाशा मुंबईत थिएटरला लागला की तमासगीराचा उत्साह वाढतो तस त्यांच झालं. केदार यांचा फड वर्षभरात बंद झाला. देठे यांनी मात्र तमाशाचा नाद सोडला नाही.
चंद्रकांत ढवळपुरीकर, दत्ता महाडीक, कांताबाई सातारकर, रघवीर खेडकर, पांडुरंग मुळे मांजरवाडीकर, अंजनाबाई साबळे, विश्वास नांदगावकर, मालती इनामदार अशा तमाशाच्या फडांमध्ये त्यांनी जवळपास २५ वर्षे काम केलं. तमाशा कलावंताच्या वाट्याला येणारी अवहेलना, दु:ख त्यांनी भोगलं. १९९१ ला आंबेडकरी गीतांचा जागर करण्यासाठी नागपूरात दीक्षाभूमीवर शाहिरी जलसा घेऊन किसन पोहचले. त्यांच पहाडी आवाजातील सादरीकरण अनेकांना भावले. *दुरदर्शनने त्याची दखल घेतली. त्यांच्या जलसा पार्टीचा गुणगौरव झाला.*
      २००१ साली देठे यांनी शेत जमीन गहाण ठेवून कर्ज काढून *‘किसनराव देठे पाडाळणेकर सह शाहीर गंगाधर जगधने मोग्रसकर’* हा तमाशाचा फड उभा केला.  कर्जाच्या गर्तेत अल्पावधीतच फड मोडला. तमाशा उभा करण्यासाठी तारण ठेवलेली जमीन आजही गहाण पडलेली असून या कलाकार दाम्पत्यास भाकरीचा चंद्र शोधण्याची भ्रांत सध्या आहे. 

*‘हिरो’ची भूमिका मिळे
आधी गनाला रनी आनला, नाहीतर रंग पुन्हा सुना सुना’.. अशी पठ्ठेबापूराव, हरिभाऊ रोकडे वडगावकर यांची आठ गण आजही मुखोद्गत आहेत. अनेक गवळणी त्यांच्या पाठ आहेत. गवळणींच्या मेळ्यात किसनदेवाची भूमिका किसन लिलया साकारीत. उंची कमी पण देखण्या चेह-यामुळे त्यांना वगनाट्यात ‘हिरो’ची भूमिका मिळे, तमाशात बेरकी पाटलाची भूमिका ते साकारत तर कधी पोलीस अधिकारी म्हणून  स्टेजवर दिसत असत.

दिवंगत दादासाहेब रुपवते, प्रेमानंद रुपवते या चळवळीतील नेत्यांसह वगसम्राट चंद्रकांत ढवळपुरीकर, दत्ता महाडीक, अंजनाबाई साबळे, रघवीर खेडकर यांनी जीव लावला. दिवंगत अंजनाबाई यांना मी बहीण मानली होती. नाशिक जिल्ह्यात तिरसुळी गावात आम्हा तमाशा कलाकारांना मारहाण झाली होती. पुणे भागात तमाशा कलाकारांना आजही आदराची वागणूक मिळते. तमाशा कलावंताचा उत्तरार्ध फार कठीण असतो, असे पाडळणे येथील कलावंत किसन मारुती देठे यांनी सांगितले.

Comments